संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

Basic terms used in Engine specifications | वाहनांच्या बाबतीत वापरल्या जाणाऱ्या काही व्याख्या

पेट्रोल किंवा डिझेल इंजिन चालविण्यासाठी किंवा इलेक्ट्रिक वाहन चालवण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर वापरली जाते. परंतु जेव्हा या इंजिनचे तुलनात्मक स्पष्टीकरण सांगितले जाते, तेव्हा शक्ती (Power) आणि टॉर्क (Torque) यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो. त्याचप्रमाणे RPM , ग्राउंड क्लिअरन्स, कर्ब वेट इत्यादी बाबीही आपल्या वाचनात येतात, आणि वाहन खरेदी करताना यांचा कुठे, कसा उपयोग होतो ते सुद्धा आपण या लेखात वाचू. 

पॉवर आणि टॉर्क तर आपले रोजचे ऐकीव आणि वाचण्यातील कॉमन शब्द झालेत, पण यांचं उपयोग काय, अर्थ काय, यापैकी कोण वाहन चालण्यास मदत करतो हे मात्र खूप कमी लोकांना माहित आहे. तर, आजच्या लेखात आपण वाचू कि पॉवर आणि टॉर्क म्हणजे काय? त्यांच्यापैकी कोण वाहन चालवण्यास करतात?

पॉवर आणि टॉर्क बद्दल आपण माहिती घेऊच, परंतु त्याआधी या सर्वांसाठी आवश्यक असलेल्या "ऊर्जा" (energy) बद्दल थोडी माहिती घेऊ. कोणतेही कार्य करण्याचा क्षमतेला ऊर्जा असे म्हटले जाते. कोणतेही कार्य करायचे असल्यास आपल्याला ऊर्जा लागतेच. मग ती ऊर्जा शारीरिक असो कि यांत्रिक. ऊर्जा हि एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात परिवर्तित (transform) करता येते. 

१. टॉर्क म्हणजे काय?

आपल्याला फोर्स म्हणजे काय असते ते माहित आहेच. एखाद्या ठराविक जागेवर दिलेला ठराविक भार  म्हणजे फोर्स (बल). ह्यालाच रेषीय बल( linear force) सुद्धा म्हणता येईल.  एकाच दिशेने सरळ रेषेत भर देऊन मिळतो तो फोर्स, आणि चक्राकार गती मध्ये मिळणारा फोर्स किंवा बल म्हणजे टॉर्क (Torque). 

what is torque and bhp in car
चित्र: टॉर्क दर्शवणारी प्रतिकृती. (Picture Credit: Wikipedia)

टॉर्क ला रोटेशनल फोर्स (Rotational Force) सुद्धा म्हणता येईल. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास; टॉर्क मुळे आपल्याला समजून येते कि एंजिन फिरायला किती बल/फोर्स लागणार. इंजिन सुरु केल्यांनतर वाहनाला जलद गती देण्यासाठी टॉर्क ची मदत होते, म्हणून याला "पुलिंग फोर्स" सुद्धा म्हटले जाते. 

याच कारणामुळे भारी वाहने, मोठ्या कार्स, SUV, बस यांच्यामध्ये जास्त टॉर्क उत्पन्न करणाऱ्या इंजिनचा वापर केला जातो. 

टॉर्क नेहमी Nm म्हणजेच न्यूटन मीटर (Newton-meter) मध्ये मोजला जातो. 

उदा. ट्रॅक्टर मध्ये कार पेक्षा खूप जास्त टॉर्क असते परंतु त्या टॉर्कच रूपांतरण वेगात करणे ट्रॅक्टरला शक्य नाही. म्हणजे खूप टॉर्क असूनही ट्रॅक्टर वेगात पळू शकत नाही कारण ट्रॅक्टर च्या इंजिन चा RPM कमी असतो. परंतु हाच ट्रॅक्टर कार पेक्षा कैकपटीने जास्त भार सहज वाहून नेऊ शकतो. अशाच प्रकारे डंपर मधेही जास्त टॉर्क ची इंजिने असतात. याउलट दुचाकी (two wheeler) किंवा कार (car) मध्ये जास्त भार/लोड उचलण्याची आवश्यकता नसते त्यामुळे त्यांचे इंजिन मध्ये टॉर्क पेक्षा RPM जास्त असतात जेणेकरून अशा वाहनांना उत्तम वेग मिळावा. 


२. पॉवर (शक्ती):  एका ठराविक वेळेत केलेलं काम किंवा संचारीत केलेली ऊर्जा म्हणजे पॉवर. मोटरचा पॉवर म्हणजे टॉर्क गुणिले मोटरच्या शाफ्टची चक्राकार गती.  सोप्या भाषेत पॉवर  = बल (force) * गती (velocity). 

वाहनांच्या संदर्भात इंजिनची शक्ती हॉर्स पॉवर (HP) किंवा ब्रेक हॉर्स पॉवर (BHP) मध्ये मोजली जाते. इंजिन जास्त पॉवरचे असेल तर वाहनाचे त्वरण (acceleration) आणि वेग (speed) खूप जास्त असते. जास्त पॉवर मुळे जास्त वेग, आणि त्यामुळे कमी वेळेत जास्त काम होते. इंजिन चा पॉवर जेवढा जास्त असेल तेवढा चांगला परफॉर्मन्स आणि इंजिनचा स्मूथनेस असेल. 

३. RPM : वाहनाच्या इंजिन मध्ये RPM  म्हणजे Revolutions किंवा Rotations Per Minute. म्हणजेच एका मिनिटामध्ये इंजिनचा शाफ्ट किती वेळा फिरतो. कित्येकवेळा वाहनाचा टॉर्क सांगताना RPM चा वापर केला जातो. उदा. - एका इंजिनचा टॉर्क 1000NM @100 RPM. म्हणजेच ते इंजिन १०० RPM  वर १००० Nm चा टॉर्क देते किंवा तेवढे बल वाहन पुढे सरकायला लागते. 

४. ग्राउंड क्लिअरन्स (Ground Clearance): चारचाकी वाहन खरेदी करताना विचारात घेतला जाणारा अजून एक महत्वाचा विषय म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स. कारचा सर्वात खालचा भाग आणि जमीन (ground) यामधील अंतर म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स.

ground clearance of car

कारचा वापर करताना आपण कधी चांगल्या रस्त्यावरून तर कधी खराब रस्त्यावरूनही चालवतो. आपल्या भारतातील खड्डे असलेले रस्ते पाहता कार घेताना जास्त ग्राउंड क्लिअरन्स असलेली कारच घेतलेली उत्तम. अन्यथा एक चाक खड्ड्यातून गेल्यास किंवा असमतल जागेवरून वाहन चालवल्यास कार रस्त्याला घासून कारचे नुकसान होऊ शकते. सर्वात कमी ग्राउंड क्लिअरन्स स्पोर्ट्स कारचा तर सर्वात जास्त ग्राउंड क्लिअरन्स SUV सारख्या वाहनांचा असतो. ग्राउंड क्लिअरन्स नेहमी मिलिमीटर (mm) मध्ये मोजल्या जातो. 

५. व्हीलबेस (Wheelbase): वाहनाच्या मागच्या चाकाचे सेंटर आणि त्याच बाजुच्या पुढल्या चाकाचे सेंटर यांचामधील अंतर म्हणजे व्हीलबेस. व्हीलबेस हे सायकल, दुचाकी, कार, ट्रक इत्यादी सर्व वाहनांना लागू होणारा घटक आहे. कारच्या बाबतीत व्हीलबेस जेवढा जास्त असेल तेवढी जास्त जागा कार मध्ये उपलब्ध असेल. व्हीलबेस म्हणजे कारची लांबी नाही. जास्त व्हीलबेस असल्यास कार चालवायला आणि वापरायला सुरक्षित राहते, कारची स्टॅबिलिटी उत्तम राहते. व्हीलबेस कमी असल्यास कर वळवण्यास सोपी जाते, याउलट व्हीलबेस जास्त असेल तर कर वळण्यास जास्त जागा लागते; पण कंफर्ट सुद्धा असतो.  

wheelbase in car
चित्र : व्हीलबेस (Picture credit: Wikipedia)

6. कर्ब वेट (Kerb Weight): वाहनाचे सर्व पार्टस जोडलेले असताना आणि इंधन टाकी पूर्ण भरलेली असताना वाहनाचे वजन म्हणजे कर्ब वेट. कर्ब वेट मोजताना वाहनात कोणीही प्रवासी किंवा कोणतेही सामान नसते. म्हणजे फक्त आणि फक्त वाहनाचे वजन. वाहनाच्या फ्युएल इफिसिएंशी म्हणजेच average वर  वाहनाच्या वजनाचा खूप मोठा फरक पडतो. जेवढे वाहन हलके तेवढी जास्त फ्युएल इकॉनॉमी मिळते. 


Posted By : TheAutoGyan

थोडे नवीन सर्वात जुने

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा