वाहनांच्या चाकांवर (टायर वर) जे कोड लिहिलेले असतात त्यामधून विशिष्ट अर्थ अभिप्रेत असतो. हा कोड समजून घेतल्यास आपल्याला टायर्सची स्पष्ट आणि पूर्ण माहिती मिळू शकते. काही कोड समजणे सोपे आहे, तर काहींना समजून घेण्यासाठी योग्य ते ज्ञान आणि त्यावरील चिन्हांचे अर्थ समजून घेणे आवश्यक आहेत. टायर च्या बाजूंवर लिहिलेले कोड समजून घेण्यासाठी (how to read tyre size) आणि आपल्या वाहनांसाठी उपयुक्त टायरची निवड करण्यासाठी हा लेख आपल्याला नक्की मदत करेल.
टायर वर असलेली सर्वसाधारण माहिती -
आपण टायरच्या बाजू बघितल्या तर आपणास बरेच कोड किंवा चिन्हे दिसतात. उदाहरणार्थ, आपल्या टायरच्या बाजूवर "P205/65R16 95H" असे काहीतरी बघितले असेल. या कोड व्यतिरिक्त, चिन्हांमध्ये उत्पादकाचे नाव आणि लोगो, दिशात्मक बाण, मंजूरी रेटिंग, हवेचा दबाव आणि काही महत्त्वाच्या गोष्टी समाविष्ट असतात. प्रथम आपण "P205/65R16 95H" हा कोड समजून घेऊया.
![]() |
| Tyre specifications chart |
205 => रुंदी. ही संख्या टायरची कमाल रूंदी आहे. ही रुंदी म्हणजे टायरच्या दोन्ही बाजूंमधील अंतर मिलिमीटरमध्ये मोजले जाते. ही रुंदी वाहनानुसार निर्मात्याद्वारे प्रमाणित केली जाते. वाहन हाताळणी, ट्रॅकशन आणि मायलेज साठी टायर ची रुंदी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि म्हणूनच नवीन टायर निवडताना लक्षात ठेवले पाहिजे.
65 => प्रसार गुणोत्तर (aspect ratio):
स्लॅश (/) नंतरच्या या संख्येस aspect ratio (प्रसार गुणोत्तर) असे म्हणतात. हे टायरच्या क्रॉस-सेक्शनच्या उंची आणि रुंदीचे गुणोत्तर (उंची:रुंदी) आहे. उदाहरणार्थ - 65 म्हणजे उंची टायरच्या रूंदीच्या 65 टक्के इतकी आहे. जर आस्पेक्ट रेशो जास्त असेल तर टायरच्या बाजू जास्त लांब असेल. अवजड वाहनांच्या टायर्सचे आस्पेक्ट रेशो 95 टक्क्यांपर्यंत असते. एक उच्च गुणोत्तर वाहनाचे हँडलिंग कठीण करू शकते परंतु ते प्रवासाला अधिक आरामदायक सुद्धा बनवते. दरम्यान, उच्च-कार्यक्षमता (high-performance car) असलेल्या कारमध्ये कमी आस्पेक्ट रेशो असतो, अशा प्रकारे उत्तम हाताळणी आणि कॉर्नरवर वाहनाचे रोलिंग कमी होते, परंतु प्रवास तेवढा आरामदायी (comfortable) ठरत नाही. चांगली वाहन हँडलिंग आणि कम्फर्ट मिळण्यासाठी टायर निर्माते नेहमी ऍस्पेक्ट रेशो संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करतात.
R=> बांधणी (Construction):
अस्पेक्ट रेशो नंतर येणारे अक्षर हे टायर ची बांधणी दर्शवते. इथे R चा अर्थ आहे रेडियल. रेडियल टायर (Radial tyre) मध्ये स्टील च्या बारीक तार पूर्ण टायर मध्ये समांतर पसरवून त्यावर रबर कोटिंग केले जाते त्यामुळे टायर मजबूत आणि लवचिक बनतात आणि टायर ला त्याचा योग्य आकार मिळतो. हे टायर लवकर गरम होत नाही त्यामुळे त्यांचं आयुष्यही जास्त असते. ह्या टायर ची किंमत (car tyre price) इतर टायर पेक्षा जास्त असते.
जर टायर वर B अक्षर असेल तर ते सुचित करते की तो टायर बायस-प्लाय (Bias-ply) टायर आहे. यामध्ये नायलॉन चे धागे तिरप्या स्थितीमध्ये एकावर एक विरुद्ध दिशेने गुंफले असतात आणि असे अनेक थर आणि त्यावर रबर कोटिंग केलेलं असतं. हे टायर खराब रस्त्यांवर सुद्धा आरामदायी प्रवासाचा अनुभव देतात तसेच अधिक लोड सहन करण्यास सक्षम असतात. पण हे टायर अति वेगात असल्यास रस्त्यावर चिकटून चालण्यास असमर्थ असतात, ते लवकर गरम होतात, वाहनाचे मायलेज कमी होते तसेच त्यांची झीज सुद्धा वेगाने होते.
16 - चाकाचा व्यास (Wheel Diameter):
ही संख्या चाकांचा व्यास दर्शवितात. टायर ज्यावर बसवल्या जातो त्या रिम किंवा ऍलोय व्हील चा हा बाह्य व्यास (Outer Diameter) आहे. आपल्या कारसाठी टायर कोणता घ्यायचा हे रिमच्या आकारावर अवलंबून असते.
95 - लोड निर्देशांक (Load Index):
लोड इंडेक्स टायरच्या जास्तीत जास्त लोड-वाहून नेण्याच्या क्षमतेशी संबंधित आहे. हाय प्रोफाइल टायरच्या तुलनेत लो प्रोफाइल टायरचे कमी लोड रेटिंग असते. चुकीचे लोड रेटिंग टायर बसविणे सुरक्षिततेशी संबंधित समस्या उत्पन्न करू शकतात आणि परिणामी गंभीर अपघातही होऊ शकतो. ही संख्या एक निर्देशांक आहे आणि उत्पादकाच्या माहिती तक्त्यामध्ये (tyre specifications chart) निर्देशांक आणि संबंधित वजन (किलोग्रॅममध्ये) तपासणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, येथे 95 चे लोड इंडेक्स टायरची 690 किलो वजन वाहून नेण्याची क्षमता दर्शवते किंवा जर एखादा टायरचा लोड इंडेक्स 65 आहे तर तो टायर जास्तीतजास्त 290 किलो वजन सुरक्षितपणे वाहून नेऊ शकतो.
H - स्पीड रेटिंग (Speed Rating):
लोड इंडेक्स प्रमाणेच, स्पीड रेटिंग हा टायरची जास्तीत जास्त वेगमर्यादा दर्शवतो. स्पीड रेटिंग आपल्याला माहिती देते कि टायर कोणत्याही नुकसानाविना किती वेगात धावू शकते. प्रवासी कारच्या टायर्ससाठी ठराविक स्पीड रेटिंग आहॆ परंतु, लाईट ट्रक म्हणजे LT मार्क केलेल्या टायरला स्पीड रेटिंग दिलेलं नसते. येथे H अक्षर हे टायरचा जास्तीत-जास्त स्पीड (२१० Km/hr) दर्शवते. त्याचप्रमाणे जर टायर वर H ऐवजी V असेल तर वेगमर्यादा (२४० Km/hr), U असेल तर वेगमर्यादा (२०० Km/hr), T असेल तर वेगमर्यादा (१९० Km/hr) आणि S असेल तर वेगमर्यादा (१८० Km/hr) असते. भविष्यातील धोके टाळण्यासाठी आपण वाहन वेगात पळवण्याआधी आपल्या टायर चे स्पीड रेटिंग आणि त्याचाशी संबंधित अधिकतम वेगमर्यादा (tyre specifications chart) जाणून घेणे समजदारीचे ठरेल.
इतर खुणा (Marking)
या व्यतिरिक्त, पूर्वी सांगितल्याप्रमाणे, आपल्याला इतर माहिती जसे की -
P=> उपयोग:
जर टायर वर P अक्षर असेल तर त्याचा अर्थ आहे "पॅसेंजर"म्हणजे प्रवासी वाहतुकीच्या वाहनांसाठी हा टायर उपयुक्त आहे. जर टायर वर P ऐवजी LT असे सूचित केले असेल तर त्याचा अर्थ आहे की हा टायर "लाईट ट्रक" म्हणजे हलक्या ट्रक साठी असून ते भारी लोड सहन करू शकतात.
दिशात्मक बाण (Directional Arrow):
जर टायर हा एक-दिशीय (unidirectional) असेल तर त्याला एका विशिष्ट पुढील दिशेने बसवणेच आवश्यक असते. अशा वेळेस टायर वर दिलेला निर्देशित करणारा बाण (Directional Arrow) टायर योग्य दिशेने बसवण्यास मदत करतो. असममितीय टायर म्हणजे ज्या टायरच्या दोन्ही बाजू वेगवेगळ्या असतात अशा टायर वर "IN" किंवा "OUT" लिहिलेलं असत. अशावेळेस योग्य ती दिशा ओळखून टायर योग्यरितीने बसवण्यास मदत होते.
उत्पादनाची तारीख:
काही टायर उत्पादक टायरच्या उत्पादनाचा महिना आणि वर्ष (date code on tyres) टायरवर छापतात.
प्रसारण दबाव (Inflation Pressure) :
टायरचे आयुष्य राखण्यासाठी आणि वाहन उत्तम चालण्यासाठी टायर मध्ये योग्य प्रेशर असणे आवश्यक असते. याचा टायरच्या कामगिरीवर मोठा प्रभाव पडतो आणि चांगला परफॉर्मन्स, वाहनाचे मायलेज, टायरची झीज कमी करणे आणि टायरचे आयुष्य वाढण्यासाठी टायर मध्ये योग्य दबाव (air pressure) असणे आवश्यक आहे. टायर वर दिलेलं प्रेशर हे नेहमी psi मध्ये असते.
तापमान निर्देशक (Temperature indicator):
टायर चांगली कामगिरी करू शकेल अश्या किमान आणि कमाल तापमान मर्यादा टायरवर दर्शविल्या असतात जेणेकरून टायर कार्यरत असताना अति जास्त किंवा अति कमी तापमानामुळे टायरचे होणारे नुकसान आपण टाळू शकतो.
याव्यतिरिक्त टायर्स वर गुणवत्ता तपासणी आणि नियमानुसार सर्व टेस्ट पास झाल्यास शेवटी मंजुरीसाठी सही केलेली असते.



टिप्पणी पोस्ट करा
टिप्पणी पोस्ट करा