संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

Petrol Ethanol Blending Benefits & Drawbacks | पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण - फायदे आणि तोटे.

टिप्पणी पोस्ट करा

जगातील बरेच देश आता जीवाश्म इंधनांपासून उर्जेच्या नवीन स्त्रोतांकडे वळत आहेत. म्हणजेच हे सर्व देश इंधन परिवर्तन करत आहेत आणि भारतात सुद्धा इंधन परिवर्तनाचा काळ सुरू आहे. तथापि, आपल्या देशात उर्जेची गरज मोठी आहे. आपण कोळश्याकडून जैविक इंधन आणि नैसर्गिक वायूकडे वळत आहोत. जर भारतालाही अक्षय ऊर्जेच्या (Renewable Energy) दिशेने वाटचाल करायची असेल तर आपण देशांतर्गत उत्पादनावर भर दिला पाहिजे. त्यासाठी जैविक-इंधन (Bio Fuels) आणि सौर उर्जा (Solar Energy) उत्पादन महत्त्वपूर्ण ठरू शकते.

Petrol Ethanol mixing



हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन सरकारने राष्ट्रीय जैवइंधन धोरण- 2018 ठरवले आहे. त्यानुसार भारतामध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण (Petrol Ethanol blending) केले जात आहे. इथेनॉल ही हरित ऊर्जा आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे बरेच फायदे आहेत. पण त्याआधी आपण जाणून घेऊया -

इथेनॉल (Ethanol) म्हणजे काय आणि ते कसे तयार केले जाते?

इथॅनॉल हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे. इथेनॉलच दुसरं नाव इथिल अल्कोहोल (Ethyl alcohol) असून त्याचा केमिकल फॉर्म्युला C2H5OH असा आहे. अनेक प्रकारच्या अल्कोहोलमध्ये फक्त इथेनॉलच बिनविषारी आणि पिण्यायोग्य अल्कोहोल आहे. हेच इथेनॉल सॅनिटायजरमध्ये 70 ते 75% वापरले जाते.



Structure of ethanol mixing with petrol

उसाच्या रसापासुन साखर बनवितांना मळी (Molasses) तयार होते. त्या मळीवर फरमेन्टेशन, डिस्टीलेशन इत्यादी प्रक्रिया करून इथेनॉल तयार केले जाते. उसाप्रमाणेच इतर पदार्थ ज्यामध्ये साखरेचे प्रमाण आहे अश्या सर्व पदार्थ  जसे कि ज्वारी, गहू, तांदूळ इत्यादी पासून इथेनॉल बनवले जाऊ  शकते.  हा द्रवपदार्थ पेट्रोल सारखाच ज्वलनशील असल्यामुळे याचा वापर पेट्रोलमध्ये मिसळुन (Petrol Ethanol blending) करता येऊ शकतो. आधी सांगितल्याप्रमाणे इथेनॉल (Ethanol) ही हरित ऊर्जा आहे कारण ते पूर्णपणे जैविक घटकांपासून बनवले जाते. ब्राझिल देशात पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर जास्तीत जास्त करण्यात येतो. तेथे २५% पेक्षा जास्त इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळुन वापरले जाते.

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे फायदे :

  1. पहिला फायदा म्हणजे पेट्रोलियमवर पदार्थांवर (Crude Petroleum oil)  भारताचे  अवलंबित्व बर्‍याच प्रमाणात कमी होईल.  सध्या भारत आपल्या गरजेच्या 83% कच्चे तेल आयात करतो.
  2. इथेनॉलच्या ज्वलनातून विषारी वायू जसे कि कार्बन मोनो ऑक्साईड (CO), कार्बन डाय ऑक्साईड (CO2), सल्फर अत्यंत कमी किंवा नगण्य प्रमाणात बाहेर  पडतात त्यामुळे वायुप्रदूषणही कमी होईल.
  3. इथेनॉलच्या ज्वलनातून पेट्रोलपेक्षा खूप कमी उष्णता बाहेर पडते, त्यामुळे इंजिन कमी गरम होऊन परफॉर्मन्स वाढेल व हरितगृह परिणाम कमी होतील.
  4. इथेनॉलचा (Ethanol) वापर वाढवून शेतकर्‍यांना फायदा होईल, त्यांचे उत्पन्न वाढेल, कारण ऊस, मका आणि इतर अनेक पिकांपासून इथेनॉल तयार केले जाते.
  5. साखर कारखानदारांना (Sugar mills) उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील जेणेकरून ते त्यांचे शेतीतील थकबाकी काढू शकतील.
  6. इथेनॉल हे खूपच किफायतशीर आहे, त्यामुळे ग्राहकांनाही पेट्रोलच्या वाढत्या किंमतींपासून थोडा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

भारतामध्ये 2013-14 साली 1% पेक्षाही कमी इथेनॉल पेट्रोल मध्ये ब्लेंड केलं जायचं. नंतर 2015-16 साली हे प्रमाण 5% आणि पुढे 2017-18 साली 8.5% पर्यंत वाढवले. २०१८ साली केंद्र सरकारने इथेनॉलविषयी स्वतंत्र धोरण जाहीर केले आणि तेव्हापासून पेट्रोल मध्ये 8.5% इथेनॉल मिश्रीत केलं जातं. २०१८ साली केंद्र सरकारने इथेनॉलविषयी जारी केलेल्या धोरणानुसार नव्या इथेनॉल प्रकल्पांना विविध सोयी सवलती देऊ केल्या. इथेनॉल खरेदीचे दर निश्चित करून इथेनॉल प्रकल्पांना खरेदीची हमी दिली. आता भारत सरकारने २०२२ पर्यंत १०%  इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळण्याचे (Petrol Ethanol blending) लक्ष्य ठेवले आहे. जागतिक पर्यावरण दिनी (5 जून 2021 ला) भारत सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्यासाठी १ एप्रिल २०२३ हा दिवस निश्चित केला आहे. त्या दिवसापासून देशभरातील पेट्रोलपंपांवरील पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळले जाईल. याला E-20 पेट्रोल असे संबोधले जाणार.

कोणाला आणि किती फायदा होईल?

इथॅनॉलमिश्रित पेट्रोलमुळे (Petrol Ethanol blending) सरकारसोबतच देशातील सामान्य जनतेलाही खूप फायदा होईल. यामुळे भारताचे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होईल. यामुळे भारताचा तेल आयातीवरील अंदाजे ३० हजार कोटी रुपये खर्च कमी होईल. तेलाच्या सतत वाढत्या किमती पाहता बचतीचा हा आकडा यापेक्षाही अधिक असू शकतो. यातून सरकारचे बहुमूल्य परकीय चलन वाचणार आहे. तसेच सतत अस्थिरतेच्या सावटाखाली असलेल्या देशातील साखर उद्योगाला (Sugar Industries) आर्थिक स्थैर्यही मिळेल. म्हणजे इथेनॉल महागाई वाढीवर सरकारसाठी एकप्रकारची संजीवनी बुटीच ठरेल. देशांतर्गत इथॅनॉलचे उत्पादन वाढल्यास शेतकर्‍यांचेही उत्पन्न वाढण्यास मदत होईल कारण, इथॅनॉल ऊस, मका, ज्वारी, तांदूळ आणि इतर अनेक पिकांपासून बनवल्या जाईल.

दरवर्षी सुमारे ५० ते ६० लाख टन अतिरिक्त साखर उत्पादन होत आहे. हेच अतिरिक्त उत्पादन कमी करून ऊसाचा वापर इथॅनॉल निर्मितीसाठी केला तर साखर कारखान्यांनाही हमखास उत्पन्नाचा एक नवा मार्ग मिळेल. यातून दरवर्षी सुमारे ७०० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होऊ शकेल. त्याव्यतिरिक्त आवश्यक असलेले ४०० कोटी लिटर इथेनॉल खराब धान्यापासून बनवण्याचे सरकारचे धोरण आहे, यामुळे वाया जाणारे धान्यही वाचेल आणि शेतकऱ्यांनाही उत्पन्नाचा नवा स्रोत मिळेल.

कोणत्या वाहनामध्ये वापरल्या जाईल इथॅनॉल?

तसे इथॅनॉल हे पेट्रोलमध्ये मिसळले जाते, परंतु जेव्हा त्याचे प्रमाण वाढवले जाईल तेव्हा इथॅनॉल (Ethanol) इंधनावर आधारित नवीन वाहनेही लॉन्च होतील. त्यासाठी सरकार योजना आखत आहे आणि लवकरच इथॅनॉलवर चालणारी वाहने बाजारात येतील. या इंधनासाठी कार आणि बाईक उत्पादकांना स्वतंत्रपणे E-20 पेट्रोलसाठी कोणते वाहन योग्य आहे ते निर्दिष्ट करावे लागेल, यासाठी एक स्टिकर देखील वाहनावर ठेवावे लागेल.

सध्याची म्हणजेच BS-6 मानांकन असलेल्या वाहनांचे इंजिन  पेट्रोलमध्ये केवळ १३ % इथेनॉल असेपर्यंत उत्तम प्रतिसाद देतात. इथेनॉलचे  प्रमाण वाढविले तर या इंजिन्समध्येही आवश्यक ते तांत्रिक बदल करावे लागतील. ऑटोमोबाइल कंपन्यांना त्यासाठी किती वेळ लागेल, तसेच जुन्या वाहनांचे काय? हाही प्रश्न आहे.

यावर उपाय काय?

सध्या वापरत असलेल्या जुन्या वाहनांसाठी लवकर पर्याय सापडला नाही तर प्रत्येक पेट्रोल पंपावर नवीन वाहनांसाठी २० टक्के इथेनॉलमिश्रित आणि जुन्या वाहनांसाठी १० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोलची वेगवेगळी व्यवस्था करावी लागेल. 

इथेनॉलमिश्रीत पेट्रोलचे तोटे:

इथेनॉल हे सॉलव्हेन्ट (Solvent = विद्रावक पदार्थ) आहे. ते कोणत्याही द्रव  पदार्थांसोबत तसेच पाण्यासोबत पूर्णपणे विरघळून जाते. जर वाहनांच्या लिकेज पेट्रोल लॉक मधून किंवा एअर होल मधून पाणी पेट्रोलच्या टाकीत घुसले तर ते इथेनॉल (Ethanol) सोबत विरघळून पेट्रोल मध्ये मिश्रीत होईल, म्हणजेच पाणी आणि पेट्रोल वेगवेगळे दिसणार नाही आणि टाकीत पाणी शिरल्याचे लवकर लक्षातही येत नाही. त्यामुळे वाहन सुरू होण्यास त्रास होईल किंवा सुरू होणारही नाही, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. इथेनॉल पेट्रोल मध्ये मिसळल्याने हा त्रास होत नाही, तर पेट्रोलच्या टाकीमध्ये पावसाळ्यात किंवा वाहन धुताना पाणी शिरले तरच हा त्रास होईल. त्यामुळे असे पेट्रोल वापरत असाल तर पेट्रोलची टाकी ठराविक दिवसांनी साफ करत राहावी.


Posted By- TheAutoGyan
 

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा