संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

कार आणि बाईक वर लॉन्ग ड्राईव्हसाठी टिप्स | Car and Bike long drive tips in Marathi

टिप्पणी पोस्ट करा
तुम्हाला लॉंग ड्राईव्हवर जायचे आहे किंवा स्वतःच्या कार/ बाईक ने कुठेतरी दूर प्रवास करत जायचे आहे आणि त्याबद्दल काही टिप्स (long drive tips) पाहिजे तर मग आपण योग्य ठिकाणी आला आहात. या पोस्टमध्ये आपल्याला लाँग ड्राइव्हवर जाण्याआधी आणि प्रवासात काय करावे याची पूर्ण माहिती मिळेल (precautions before long drive).

best indian car for long drive, Long drive tips in marathi, long drive tips, tips before going yo longdrive, longdrive, longdrive tips
Car Long Drive

तुमचा प्रवास सुरक्षित, स्वस्त आणि अधिक आनंददायी करण्यासाठी अनेक long drive tips या लेखात दिलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही रोड ट्रिपची (long road trip plan) किंवा लॉंग ड्राईव्हची योजना बनवत असाल त्यावेळेस इथे दिलेल्या टिप्स नक्की लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही सुरक्षितपणे आणि आरामात तुमचा प्रवास पूर्ण करू शकाल. 

 ■ वाहनाची काळजी


1. कारने लांबच्या प्रवासाला निघायचे असेल तर शक्यतो 2 दिवस आधी सर्व्हिसिंग करून घ्यावी (गरज असेल तरच), आदल्या दिवशी करू नये. त्या 2 दिवसात काही प्रॉब्लेम येतो का ते चेक करावे. जर ऑइल बदलले असेल तर किमान 50 किमी तरी कार चालवलेली असावी, जेणेकरून काही लिकेज किंवा इंजिनच्या आवाजातील फरक कळू शकेल.
हाच नियम बाईक ला पण लागू होतो.

2. लांबच्या प्रवासाला निघण्यापूर्वी कारचे डिस्क ब्रेक, ब्रेक पॅड, ब्रेक ऑइल लेवल सर्व व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्यावी. डिस्क ब्रेक असलेल्या बाईक साठी सुद्धा ही तपासणी करून घ्यावी.

3. आपल्या कार/ बाईक च्या मॅन्युअल बुक मध्ये सांगितल्याप्रमाणे त्याच स्टॅंडर्ड चे ब्रेक ऑइल वापरा आणि प्रवासात ऑइलचा 1 extra कॅन सोबत घ्या. जवळपास 100 ते 150 ml चा छोटा कॅन असतो हा. जर प्रवासादरम्यान ब्रेक मध्ये काही बिघाड झाल्यास इतर सर्व पार्टस मिळून जाईल पण त्याच स्टॅंडर्ड चे ऑइल मिळणे कठीण जाते. डिस्क ब्रेक ऑईल ही फार वेगळी भानगड असते, इमर्जन्सी मध्ये दुसरं कुठलं ऑइल भरणे जीवावर बेतु शकते.


long drive tips, long drive bike, bike long drive tips, long drive tips, long drive tips in Marathi, Long drive in Marathi
long drive on bike

4. आपल्या वाहनांच्या इंजिन कॅपॅसिटी आणि वयानुसार इंजिन मध्ये चांगले ऑइल टाका. कारमध्ये नेहमी full synthetic ऑईलच वापरा. 
जर बाईक 5000 किमी पेक्षा जास्त चालली असेल तरच semi-synthetic आणि full-synthetic ऑइल वापरा. त्यातही बाईक इंजिन 100-110 CC असेल तर मिनरल किंवा semi-synthetic oil 10W30 किंवा 10W40 ग्रेडचे वापरा. जर इंजिन 125 - 180 CC असेल तर semi-synthetic ऑईल 10W40 किंवा 15W50 वापरा. ही सेमी-सिंथेटिक ऑइल 5000 ते 5500 किमी पर्यंत टिकतात आणि उत्तम लुब्रिकेशन देतात. 180 CC पेक्षा जास्त इंजिन असेल तर फुल सिंथेटिक ऑइल 20W40 किंवा 15W50 ग्रेडचे वापरा. हे ऑइल 10,000 किमी पर्यंत बदलण्याची आवश्यकता नसते. BS4 आणि BS6 नुसार सुटेबल इंजिन ऑइल वापरा.
जेवढे मोठे इंजिन तेवढे ते जास्त गरम होतात आणि म्हणून त्यानुसार वेगवेगळे ऑइल वापरले जातात.

इंजिन ऑईलचे प्रकार आणि ग्रेड बद्दल पूर्ण माहिती, आपल्या कार/बाईक साठी योग्य ऑइल कसे निवडावे- नक्की वाचा.

5. प्रवासाला निघण्याआधी कारमध्ये कुलंट योग्य लेव्हलला भरून घ्यावा. बॅटरी वॉटरची लेवल तपासा, आवश्यकता असल्यास बॅटरी चार्जिंग करून घ्या.

6. कार असो वा बाईक 1 एक्स्ट्रा हेड्लाईट बल्ब सोबत ठेवा, तत्पूर्वी सर्व्हिसिंग मध्ये हेडलॅम्पस, इंडिकेटर lights, पार्किंग lights, टेल लॅम्पस ठीक कार्य करत असल्याचे तपासून घ्या. बाईकची वॉरंटी संपली असेल तर चारही इंडिकेटरला हजार्ड लाईट्स (hazard lights) ची सेटिंग करून घ्या जसे कारमध्ये एकाच वेळेस चारही इंडिकेटर लागतात. रस्त्यावर किंवा बाजूला थोड्या वेळासाठी वाहन उभे करताना हे हजार्ड लाईट उपयोगी पडतात.


7. टायर, ट्यूब नवीन असेल तर उत्तम. जुने असेल तर सोबतीला एक ट्यूब एक्स्ट्रा (मागची) घ्या. कारण, पंचर झाल्यास पंचर जोडू शकतो पण पंचर मोठा असेल, ट्यूब फाटला किंवा 2 पेक्षा जास्त पंचर असेल तर ट्यूब बदलणे चांगले. त्यामुळे तुमच्या बाईकच्या मापानुसार एक ट्यूब अवश्य सोबत ठेवा. 
कार मध्ये प्रवासाला निघण्यापूर्वी स्टेपनी, जॅक तपासून घ्यावी.

8. कारची व्हील बॅलन्सिंग आणि अलायमेंट (wheel balancing and alignment) करून घ्यावी. त्यामुळे टायर चे आयुष्य वाढून ड्राइविंग एक्सपिरियन्स छान मिळतो.

9. गाडीच्या छोट्या मोठ्या तक्रारी स्वतः दुरुस्त करता येत असेल तर एक टूलकिट ज्यामध्ये वाहनाला लागणारे सर्व पाने, पेचकस, ऍलन की आणि इतर साहित्य असेल, ते सोबत घ्यावे. 


प्रवासात पोशाख कसा असावा


1. कारने किंवा बाईकने प्रवास करताना कपडे शक्यतो सैल असावे ज्यामुळे गर्मीचा त्रास होणार नाही आणि प्रवासात अडचण होणार नाही.

2. जीन्स पॅन्ट, स्किन टाईट पॅन्ट आणि स्किन टाईट शर्ट/टी-शर्ट शकतो टाळा. यामुळे कम्फर्टेबल बसण्यास त्रास होतो. बाईकवरून दुपारचा प्रवास असेल तर काळे कपडे टाळा नाहीतर उन्हाचा त्रास होईल.

3. पायामध्ये चप्पल किंवा सँडल ऐवजी शूज घाला, शक्य असल्यास सेफ्टी शुज वापरा, यांची बॉटम ग्रिप उत्तम असते आणि सुरक्षितही असतात. बाईकवर घालण्यासाठी वेगळे शुज मिळतात पण ते प्रचंड महाग असतात. पायामध्ये अँकल लेंथ सॉक्स (स्पोर्ट्स सॉक्स) वापरा, लांब सॉक्सचं इलॅस्टिक पोटरीवर घट्ट बसल्यास पायाला मुंग्या येण्याचा त्रास होऊ शकतो.
कारमध्ये तुम्ही चप्पल किंवा शूज घालून कम्फर्टेबल नसल्यास अनवाणी पायानेही कार चालवू शकता.


आरोग्याची काळजी


लॉन्ग ड्राईव्ह (long drive on bike) वर जाताना भयानक उन्हात तापलेल्या रस्त्याने प्रवास करणे त्रासदायक असते, अश्यावेळी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

1. बाईक ने प्रवास करत असल्यास पहाटे 4 -5 वाजताच प्रवास सुरु करावा, जेणेकरून दिवस उजाडे पर्यंत ऊन तापायच्या आत आपण बरेच अंतर कापलेल असेल.

पहाटे निघाल्यास आपण आपल्याच ओळखीच्या रस्त्याने जात असतो त्यामुळे अंधार असला तरी रस्ता ओळखण्यास त्रास होत नाही. 

2. उन्हाळ्यात डिहाइड्रेशन च्या त्रासापासून वाचण्यासाठी वारंवार थोडे-थोडे पाणी पीत राहावे.

3. डोक्यावर रुमाल बांधून त्यावर हेल्मेट घालावे, असे केल्याने डोक्यातून निघणारा घाम चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर येणार नाही.


4. हायवेवर मोठी वाहने वेगाने जातात त्यामुळे रस्त्यावरील बारीक खडी व धूळ उडून डोळ्यात जाऊ शकते त्यामुळे हायवेवर बाईक चालवताना हेल्मेटची काच बंद ठेवा. हायवेवर कार चालवताना त्याचा पूर्ण काचा बंद करून आणि आवश्यकतेनुसार AC सुरू ठेऊन चालवावी. 

5. प्रवासात दोघे व्यक्ती असल्यास आलटून पालटून वाहन चालवावे.

6. बाईक प्रवासात (bike trip) प्रत्येक 100 - 150 किलोमीटर दरम्यान 15 ते 20 मिनिटांचा एक ब्रेक घ्यावा. यामुळे इंजिन थंड होण्यास आणि ड्रायव्हर ला फ्रेश होण्यास मदत होते. कार प्रवासात 150- 200 किमीवर ब्रेक घेतल्यास उत्तम.


 ■ इतर काळजी


1. BS4 आणि BS6 वाहनामध्ये हेडलाईट पूर्णवेळ सुरूच असतात पण तुमचे वाहन त्यापेक्षा जुने असेल तर साधारण सुर्यास्ताच्या अर्धा तास आधी हेडलाईट सुरू करून प्रवास करा.
 
2. कार किंवा बाईक मध्ये इंधन (डिझेल/पेट्रोल) शक्यतो COCO (Company Owned Company Operated) पंपवर म्हणजे कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या पंपवरच भरा, इतर अनोळखी पेट्रोल पंपवर होणाऱ्या फसवणुकीपासून वाचाल. याची पूर्ण माहिती तुम्हाला कंपनीच्या वेबसाईटवर (HP, Bharat Petroleum, Indian ई.) मिळेल. तुम्ही ज्या मार्गावरून जाणार त्या मार्गावरील अश्या पंपाची माहिती ठेवा.

3. बाईकवर एकटेच लांबच प्रवास करत असाल तर शक्यतो जास्त कॅश सोबत ठेऊ नका. आजकाल प्रत्येक ठिकाणी ATM आहेच शिवाय इमर्जन्सीमध्ये पेट्रोलपंपावर सुद्धा कार्ड स्वाईप करुन कॅश घेता येते, यासाठी बहुतेक 2 ते 2.5 % कमिशन घेतात.

4. संध्याकाळी किंवा रात्री, एखाद्या लांबवर प्रवासाला निघालेल्या पिकप/ ट्रकच्या जथ्याबरोबर प्रवास करा. समोरच्या वाहनाच्या टेललँपकडे नीट लक्ष असावे. लोखंडी सळ्यांनी भरलेला, उसाने भरलेला ट्रक, वाळूची वाहने असल्या वाहनांपासून दूरच राहावे.
 

5. मोठ्या वाहनांच्या मागे गाडी चालवताना शक्यतो चाकामागे चाक अशीच गाडी चालवावी, समोरच्या गाडीने चुकवलेले खड्डे, मेलेले प्राणी वगैरे आपोआप चुकवले जातात. शक्यतो ब्लाइंड स्पॉट (avoid blind spots) मध्ये वाहन चालवणे टाळावे. समोरच्या ट्रक किंवा इतर वाहनचालकाला तुम्ही त्याच्या side mirror मध्ये दिसू शकेल अश्याप्रकारे त्यांच्या मागे वाहन चालवावे.

6. पावसाळ्यात रस्त्यावरच्या पाण्याची पातळी दुचाकीच्या सायलेन्सरच्या वरती असेल तर असे रस्ते ओलांडू नयेत. बॅटरी आणि सायलेन्सर मध्ये पाणी घुसल्यास प्रॉब्लेम होईल. तसेच चाकांमध्ये हवा असल्यामुळे ते पाण्यावर तरंगतात त्यामुळे रस्त्यावर पकड कमी होऊन वाहने वाहून जातात. रस्ता ओलांडणे खूपच गरजेचे असेल तर एखाद्या मोठ्या गाडीची वाट बघावी व त्यांच्या मागच्या चाकामागून असे पाणी भरलेले रस्ते ओलांडावेत.


7. बाईकच्या मागच्या सीटवरून सामान न्यायचे असेल तर शक्यतो पक्के बांधून घ्या, ते हलणार-डुलणार नाही याची काळजी घ्यावी. बाईकला दोन्ही बाजूला सामान/ बॅग बांधायचे असेल तर दोन्ही बाजूला सारखे वजन असावे, ज्यामुळे वाहनाचा बॅलन्स जाणार नाही. पाठीवरची बॅग मागे सीटवर टेकेल एवढी सैल ठेवा जेणेकरून गाडी चालवताना वजन तुमच्या खांद्यावर येऊ नये.

8. आपल्या सर्वांना माहित आहे की लांबचा प्रवास सुरुवातीला उत्साहवर्धक वाटतो पण हा उत्साह वेळेसोबत कमी कमी होत जातो. ड्राइविंग करताना थोड्याच वेळात  आपल्याला अस्वस्थ आणि बोरिंग वाटू लागते. त्यामुळे कारमध्ये हळू आवाजात तुमची आवडती गाणी नक्की वाजवा, त्यामुळे थकवा जाणवणार नाही, पूर्ण लक्ष ड्राइविंगवर राहील.

9. घरच्यांना तुमच्या या प्रवासाबद्दल कल्पना देउन ठेवा.

इतर टीप :


1. ट्राफिक असेल तर रात्री डिप्पर लाईट (use dipper at night) लावूनच वाहन चालवा, समोरून येणाऱ्या वाहनाला डिप्पर लाईट साठी सिग्नल द्या.

2. बाईकवर हेडफोन लावून किंवा कारमध्ये मोठ्याने गाणे वाजवून वाहन चालवू नका. मागच्या वाहनाचा किंवा वळणावर समोरून येणाऱ्या वाहनाचा हॉर्न न ऐकू आल्यास अपघात घडू शकतात.

3. दारू पिऊन किंवा इतर कोणतीही नशा करून वाहने चालवू नका. वाहन चालवताना फोनचा वापर करू नका.

4. कार शक्यतो 60 ते 80 किमी/तास पेक्षा जास्त वेगात चालवू नका, बाईकचा वेग पण 65 किमी/तास पेक्षा जास्त नसावा. यामुळे प्रवास सुरक्षित होतो आणि मायलेज पण जास्त मिळते. 

5. वाहन चालवताना नेहमी बचावात्मक राहा, कधी कोणते वाहन कसे येईल आणि काय अघटित घडेल याचा नेम नसतो, हेच लक्षात ठेवून आजूबाजूच्या वाहनांवर आणि वाहनचालकांवर लक्ष असू द्या.

6. रस्त्याचा कडेला वाहन थांबवायचे असल्यास वळणावर किंवा त्याचा आसपास थांबू नका, जिथे सरळ रस्ता असेल अश्याच ठिकाणी वाहन उभे करावे.

7. वाहनात रिकाम्या पाण्याच्या बाटल्या खाली टाकू नका. त्या बाटल्या सीटच्या मागे मॅगझीन होल्डर किंवा पार्सल ट्रे वर ठेवा. एखादी रिकामी पाण्याची बाटली ड्रायव्हरच्या पायाजवळ येऊन क्लच, ब्रेक आणि एक्सेलरेटरच्या खाली आल्यास ब्रेक काम करणार नाही त्यामुळे अपघात नक्की होतो. 

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा