संपर्क फॉर्म

Copyright ©2021 - The Autogyan

Car Engine Oil Filter Explained : कार इंजिन ऑइल फिल्टरची उपयोगिता, रचना, घटक, कार्यप्रणाली आणि घ्यायची काळजी

टिप्पणी पोस्ट करा
चारचाकी वाहनांच्या इंजिनची स्नेहन प्रणाली (Four Wheeler engine lubrication system) ही इंजिनमधील सर्वात महत्वाच्या घटकांपैकी एक आहे. या लुब्रिकेशन सिस्टमचा मुख्य घटक आहे लुब्रिकंट म्हणजेच इंजिन ऑइल, जे पूर्ण इंजिनमध्ये फिरून आतल्या पार्ट्सना योग्य स्नेहन पुरवते. इंजिनमध्ये फिरणारे इंजिन ऑइल आतील भागांना (पार्ट्स) कोरड्या घर्षणापासून, लवकर झीज होण्यापासून, जास्त गरम होण्यापासून आणि इंजिन जॅम होण्यापासून संरक्षण देते.

तसेच, ही ऑईल्स घर्षणातून तयार होणारा गाळ, कचरा स्वतःमध्ये सामावून घेते आणि इंजिन साफ ​​ठेवते. अशा दूषित पदार्थांना इंजिनमध्ये आणखी पसरण्यापासून रोखण्यासाठी हे ऑइल फिल्टर इंजिन सिस्टिम मध्ये बसवले असतात.

Engine Oil filter diagram
चित्र : कार इंजिन ऑइल फिल्टर आणि त्याचे घटक

ऑइल फिल्टर करत असलेली मुख्य कार्ये | Importance of Engine Oil Filters


° यांत्रिक घर्षणातून तयार होणाऱ्या अशुद्धी, धातूंचे सूक्ष्म कण आणि त्यातून तयार होणारा गाळ (sludge) या फिल्टर मध्ये वेगळा होऊन साठवला जातो, त्यामुळे इंजनचे आयुष्य वाढते.
° लुब्रिकेशन प्रणालीमध्ये ऑईलचे प्रेशर कमी होऊ नये यासाठी जास्तीत जास्त ऑइल प्रवाह क्षमता सुरळीत ठेवण्यास मदत करते

या बाबी लक्षात घेता, ऑइल फिल्टर कसे कार्य करते? ऑइल फिल्टर कधी बदलायचे ? हे जाणून घेणे महत्वाचे आहे. याबद्दल पूर्ण माहिती पुढे तुम्हाला या लेखामध्ये मिळेल.

बहुतेक कारमध्ये इंजिन ऑइल फिल्टर बोनेट उघडून बघितल्यास इंजिनच्या बाजूला किंवा इंजिनच्या खालच्या बाजूस डोकावून पाहिल्यास इंजिनच्या तळाशी दिसेल. वेगवेगळ्या कंपनीच्या कारसाठी तसेच मॉडेलनुसार वेगवेगळ्या प्रकारचे आणि आकाराचे ऑइल फिल्टर असतात. 

ऑइल फिल्टरची रचना  | Oil Filter Structure and Compositions

ऑइल फिल्टरची बाह्य रचना मुख्यतः एका सिलेंडरप्रमाणे (किंवा वाटी प्रमाणे) असते जे धातूचे बनलेले असते. आतमध्ये एक सच्छिद्र फिल्टर असते जे सेल्युलोजच्या सुक्ष्म तंतू आणि कृत्रिम काच तंतू (ग्लास फायबर) आणि पॉलिस्टर सारख्या कृत्रिम तंतूंपासून बनलेले असते. या तंतूंमुळे फिल्टरची गाळण क्षमता आणि आयुष्य वाढण्यास मदत होते. या फिल्टरमध्ये मजबुती साठी 'रेझिन' सुद्धा भरलेले असते. या फिल्टरला तोंडाच्या बाजूवर म्हणजे जी बाजू इंजिनला जोडली जाते तिथे एक रबर गास्केट (सील प्रमाणे) लावलेली असते, जेणेकरून ऑइल लीक होऊ नये.

Engine Oil filter Structure and Components
चित्र: इंजिन ऑइल फिल्टर रचना आणि घटक

फिल्टरमध्ये जेवढे जास्त कृत्रिम तंतू (synthetic fibres) असेल तेवढी चांगली गुणवत्ता आणि गाळण क्षमता त्या फिल्टरची असते, म्हणून उच्च गुणवत्तेच्या महाग फिल्टर्स मध्ये सिन्थेटिक फायबर्सचे प्रमाण जास्त असते.

इंजिन ऑइल फिल्टरचे घटक | Components of Engine Oil Filter


1. बॉडी (Body/Housing) : फिल्टरची बाह्य बॉडी धातूपासून बनलेली असते जी दिसायला एखाद्या वाटीसारखी दिसते. ह्या बॉडीवर षट्कोनी किंवा अष्टकोनी स्वरूपात कडा असतात (एखादा मोठा पाना लावता येईल अश्या कडा), जेणेकरून फिल्टर लावताना आणि काढताना फिल्टरवर पकड घट्ट बसेल. फिल्टरच्या तोंडाच्या बाजूवर एक गोलाकार धातूची चकती (प्लेट) असते ज्यामध्ये छोटे-मोठे अनेक छिद्रे असतात. फिल्टरच्या मध्यभागी माऊंटिंग थ्रेड (पीळ/आटे) असतात ज्याद्वारे फिल्टर इंजिनला घट्ट जोडले जाते. तसेच, याच फिल्टरच्या तोंडावर सील (रबर गॅस्केट) जोडलेले असते ज्यामुळे ऑइल लीक होत नाही.

काही वाहनांमध्ये न काढता येणारे पर्मनंट ऑइल फिल्टर (permanent oil filter) असतात. अशा फिल्टरची बॉडी काढली जाऊ शकत नाहीत, पण इंजिनमधील ऑइल बदलताना फक्त आतले फिल्टर माध्यम बदलल्या जातात. अशाप्रकारच्या फिल्टरचे प्रमाण पूर्णपणे बदलता येणाऱ्या फिल्टरपेक्षा खूप कमी आहे. आपल्या देशात जवळपास सर्वच कारचे ऑइल फिल्टर हे पूर्णपणे वेगळे काढून बदलता येणारे आहेत.

2. ऑइल फिल्टर माध्यम (Oil Filtration Medium) : फिल्टर माध्यम म्हणजेच ऑइल फिल्टर करणारी आतली गाळणी ही विशेष कागदाची बनलेली असते, ज्याला कृत्रिम तंतूं आणि ग्लास फायबरसह 'रिइन्फोर्स' केलेला असतो. धातूच्या फिल्टर बॉडीमध्ये या कागदी फिल्टर माध्यमाला घडी घालून पसरवलेला असतो, जसा BS4 आणि BS6 दुचाकींचा एअर फिल्टर असतो त्याप्रमाणे. या घड्या घालण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे ऑइल फिल्टरचा आकार लहान असल्याने फिल्ट्रेशन क्षेत्र जास्तीत जास्त वाढवणे, जेणेकरून ऑइल वेगाने फिल्टर होत राहील.

ऑइल फिल्टरच्या अश्या प्रभावी रचनेमुळे तेलाच्या प्रवाहाला कमीतकमी अडथळा येऊन (ऑइल प्रेशर न वाढता) इंजिन ऑइलमधून गाळ आणि प्रदूषके प्रभावीपणे साफ होत राहते.

3. ऑइल फिल्टर बायपास आणि ड्रेन व्हॉल्व (Oil Filter Bypass and Drain Valve) : फिल्टर हाऊसिंगमध्ये ऑईलचे अतिरिक्त प्रेशर आपत्कालीन स्थितीत कमी करण्यासाठी बायपास व्हॉल्व्ह आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, फिल्टरमध्ये दबाव/प्रेशर वाढणे म्हणजे पंपद्वारे योग्य प्रमाणात ऑइल पुढे इंजिनमध्ये ढकलल्या जात नाहीये आणि त्यामुळे इंजिनमधे तेलाची कमतरता भासते.  अशावेळी 'बायपास व्हॉल्व्ह' द्वारे इंजिन ऑईलचा प्रवाह बायपास करून 'ऑइल फिल्टर माध्यमा'तून न जाता ऑइल फिल्ट्रेशन/ गाळण्याची प्रक्रिया वगळली जाते.

इंजिन बंद झाल्यानंतर जेव्हा ऑइल पंप बंद होतो त्यावेळेस पम्पच्या लाईनमधीन पूर्ण ऑइल रिकामे होऊ नये म्हणून ड्रेन वाल्व (ज्याला अँटी-ड्रेन वाल्व सुद्धा म्हणतात) आवश्यक आहे. परिणामी, इंजिनवरील ऑइल पूर्णपणे खाली वाहून जाऊन तळाशी जमा होत नाही, ज्यामुळे इंजिन सुरू केल्यानंतर इंजिनला त्वरित लुब्रिकेशनचा (ऑईलचा) पुरवठा करणे शक्य होते.

इंजिन ऑइल फिल्टरची कार्यप्रणाली | Working of Engine Oil Filter


सर्वसाधारणपणे, बहुतेक इंजिनची इंजिन ऑइल प्रणाली आणि ऑइल फिल्टरच्या कार्यपद्धतीचे सिद्धांत समजण्यास जास्त कठीण नाही.

प्रथम, ऑइल पंप संपमधून (sump) तेल ओढतो, त्याचा दाब (pressure) वाढवतो आणि फिल्टरला हे दबावयुक्त ऑइल पुरवतो. हे ऑइल, फिल्टरच्या तोंडावर असलेल्या छिद्रांद्वारे ऑइल फिल्टरमध्ये प्रवेश करते. ऑईलच्या दाबामुळे, अँटी-ड्रेन वाल्व उघडतो त्यानंतर ऑइल आत शिरते.

पुढे, दबावामुळे हे ऑइल फिल्टरमधून (engine oil filter) जाते आणि मध्यवर्ती वाहिनीला पुरवले जाते. ऑइल फिल्टर माध्यमातून जात असताना ऑईलमधील गाळ आणि धातूचे सूक्ष्म कण (3 मायक्रोन पेक्षा जास्त आकाराचे) साचून राहतात आणि शुद्ध ऑइल पुढे इंजिनला पुरवले जाते. 3 मायक्रोन पेक्षा लहान आकाराचे गाळाचे कण या फिल्टर माध्यमातून प्रवेश करू शकतात जे इंजिनला किंवा आतल्या पार्ट्सला कोणताही धोका पोचवू शकत नाही.

इंजिन ऑइल (engine oil) मध्यवर्ती वाहिनीमध्ये प्रवेश केल्यानंतर, लुब्रिकेशन सिस्टिम मध्ये पंपद्वारे वितरित केले जाते. जर ऑइल खूप घट्ट झाले, थंड वातावरणात गोठले, अति वापरामुळे त्याचे गुणधर्म गमावले किंवा फिल्टरमधील फिल्टर माध्यम खूप घाणेरडा झाला असेल तर फिल्टरमध्ये ऑइल प्रेशर वाढते आणि लिमिटपेक्षा जास्त प्रेशर झाल्यास बायपास वाल्व उघडला जातो.

बायपास व्हॉल्व्ह उघडण्यामागचा एकच हेतू असतो की जर वरील पैकी कोणत्याही कारणाने इंजिन ऑइल फिल्टरमधून प्रवेश करत नसेल तर ऑईलच्या कमतरतेमुळे इंजिनच्या पार्टस मध्ये घर्षण होऊन त्यांची झीज होऊन ते खराब होऊ नये. दुसरे एक कारण म्हणजे बायपास व्हॉल्व्ह उघडल्याने फिल्टरला कोणतीही इजा न होता कार्य सुरू राहते. बायपास व्हॉल्व्ह उघडल्यामुळे ऑइल फिल्टरमधून शुद्ध न होता सरळ लुब्रिकेशन सिस्टीम मध्ये वितरित होते आणि इंजिनचे कार्य सुरळीत सुरू राहते.

इंजिन ऑइल फिल्टर निवडताना घ्यायची काळजी | Precautions while choosing Engine Oil Filter


आज बाजारात विविध प्रकारचे ऑइल फिल्टर विक्रीसाठी आहेत, वेगवेगळ्या कारसाठी मूळ कार निर्मात्या कंपनीचे आणि त्यांचाच सारखे इतर कंपनीचे बनावटी फिल्टर सुद्धा उपलब्ध आहेत. या सर्वांमध्ये सर्वोत्तम ऑइल फिल्टर हे मूळ कार निर्मात्या कंपनीचेच असतात किंवा इतर चांगल्या कंपनीकडून बनवलेले उच्च प्रतीचे फिल्टर असतात. उदा. टाटा कंपनीच्या एखाद्या कारसाठी टाटा कंपनीचे ऑइल फिल्टर अतिशय योग्य निवड राहील किंवा त्याचप्रमाणे एखाद्या नामांकित कंपनीने जसे की TVS ने बनवलेली फिल्टर असेल तर ते सुद्धा चांगल्या दर्जाचे असू शकतात.

इंजिनसाठी योग्य ऑइल फिल्टर निवडणे (choosing engine oil filter) खूप महत्त्वाचे आहे. सर्वोत्तम ऑइल फिल्टर कार उत्पादकाने कार संबंधी दिलेल्या सर्व नियमांचे आणि अटींचे पालन करून बनवलेले असतात. मूळ कंपनीच्या फिल्टरमध्ये विश्वासार्ह आणि टिकाऊ फिल्टर बॉडी, उच्च दर्जाचे रबर सील, उच्च दर्जाचे फिल्टर माध्यम आणि योग्यरीत्या ट्यून केलेले व्हॉल्व्ह असतात. एखाद्या लोकल कंपनीचे किंवा बनावटी फिल्टर असेल तर त्या मध्ये वरीलपैकी एकही किंवा कोणतेही दर्जात्मक गुण नसतील, त्यामुळे इंजिनला धोका पोहचू शकतो.

शेवटी आपण एवढं लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक वेळेस इंजिन ऑइल बदलताना ऑइल फिल्टरसुद्धा बदलणे आवश्यक आहे. ऑइल किंवा फिल्टर उशिरा बदलण्याने किंवा वेळेवर न बदलण्याने खराब झालेल्या जुन्या ऑईलमुळे इंजिन पार्ट्सना नुकसान पोहचू शकते. त्यामुळे कार निर्मात्या कंपनीने शिफारस केल्यानुसारच योग्य ग्रेडचे आणि प्रकारचे ऑइल वापरा, वेळेवर ऑइल आणि ऑइल फिल्टर बदला नाहीतर इंजिनचा पॉवर, पिकअप आणि मायलेज कमी झाल्यास आश्चर्य वाटू देऊ नका.


Related Posts

टिप्पणी पोस्ट करा